वाळू पकडण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या अंगावर हायवा घालण्याचा प्रयत्न

Foto
६ ब्रास वाळूसह हायवा पळविला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोड, (प्रतिनिधी) विनापरवाना व विनारॉयल्टी वाळूची वाहतूक करणारा हायवा अडवून कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल पथकाला धमकावत त्यांच्या अंगावर हायवा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ ऑक्टोबरच्या रात्री पेंडगाव शिवारात घडली.

या वेळी सहा ब्रास वाळूसह हायवा पळवून नेण्यात आला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळीबाबा घाटनांद्रा येथून शेलगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेंडगाव शिवारातील मंदिराजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री ११. २० ते ११. ५० वाजेदरम्यान हा प्रकार घडला. 

ग्राम महसूल अधिकारी विशाल अशोक दुनगहु आणि पेंडगावचे पोलिस पाटील यांनी विना क्रमांकाचा विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक हायवा अडविला. चालकाकडे रॉयल्टी नसल्याचे आढळल्यानंतर हायवा तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, कारमधून आलेल्या श्याम चोपडे, योगेश दादाराव मोरे (रा. घाटनांद्रा) आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीसह हायवा चालकाने पथकाला धमकावल्याचा आरोप आहे. यानंतर हायवा पथकाच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत सहा ब्रास वाळूसह वाहन पळवून नेल्याची तक्रार महसूल अधिकारी विशाल दुनगहु यांनी दिली. 

या वाळूची अंदाजे किंमत १८ हजार रुपये आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हायवा चालकासह एका संशयिताचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. ठाकरे करीत आहेत.